औरंगाबाद – शिवसेनेचा
बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाला भगदाड पाडण्याची ताकद फक्त
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे. पक्षाने
आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी औरंगाबाद मतदारसंघ राष्ट्रवादी
काँग्रेसला सोडवा असे म्हटले आहे, त्या पार्श्वभूमीवर ‘सांजवार्ता ऑनलाईन’ने आमदार सतीश चव्हाण यांची
भूमिका जाणून घेतली.
‘शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला
भगदाड पाडण्याची ताकद राष्ट्रवादीत’
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभेसाठी आघाडी झाली आहे. राज्यातील ४८ पैकी ४० मतदारसंघावर उभय पक्षांचे जवळपास एकमत झाले आहे. उर्वरीत आठ मतदारसंघापैकी एक असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. मागील २० वर्षांपासून काँग्रेस या परंपरागत मतदारसंघात पराभूत होत आली आहे. त्यामुळे काँग्रेस सातत्याने पराभूत होत असलेला हा मतदारसंघ २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आहे. राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटल्यास मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हेे उमेदवारीचे प्रबळ दावेेदार समजले जातात.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘औरंगाबाद हा ३५ वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. रामकृष्ण बाबा पाटील यांचा १३ महिन्यांचा कार्यकाळ सोडला तर शिवसेना येथे सातत्याने विजयी होत आली आहे. मात्र आघाडीमध्ये जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर सेनेच्या या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्याचे काम राष्ट्रवादी निश्चित करेल.’ औरंगाबाद लोकसभा हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असल्याचे सांगत आमदार चव्हाण म्हणाले, की आघाडीत औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला पाहिजे, त्यानंतर उमेदवारीचा विचार होईल. अजून तरी हा जर-तरचा प्रश्न आहे. मात्र आपणही येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी मनमोकळेपणाने मान्य केले.
वंचित बहुजन आघाडी-एमआयएमचा
परिणाम नाही
वंचित बहुजन आघाडीची
ऑक्टोबरमध्ये औरंगाबादेत विक्रमी सभा झाली. याच सभेत एमआयएम देखील या आघाडीसोबत
येऊन मिळाली आहे. ही आघाडी देखील औरंगाबादमध्ये आपली ताकद आजमावणार आहे. यावर
आमदार चव्हाण म्हणाले, ‘सभेला होणारी गर्दी वेगळी आणि त्याचे मतांमध्ये परिवर्तन होणे, या दोन वेगळ्या
गोष्टी आहेत. दुसरीकडे एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचे गेल्या चार-साडेचार वर्षांत दिसून
आले आहे.’ मतदार हुषार
असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, ‘मतदारांना आता बदल हवा आहे. भाजपला मदत होईल असे कोणतेही
पाऊल मतदार उचलणार नाही. कारण मतदारांनाही आता कळून चुकले आहे, की एमआयएमला मत म्हणजे
अप्रत्यक्ष भाजपला मदत आहे. त्यामुळे ते आपले मत वाया घालवणार नाही.’
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या
जागा वाटपात आता औरंगाबाद मतदारसंघ कोणाकडे जातो आणि कोण शिवसेनेला टक्कर
देण्यासाठी सक्षम आहे हे पाहाणे आता औत्सूक्याचे आहे. त्यासोबतच काँग्रेसही राष्ट्रवादीला किती मनापासून साथ देणार हेही पाहावे लागेल.